पूज्य श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी,
उपस्थित सर्व संत, दत्तपीठम् चे सर्व भक्त अनुयायी आणि महोदय आणि महोदया!
एल्लरिगू …
जय गुरु दत्त!
अप्पाजी अवरिगे,
एम्भत्तने वर्धन्ततिय संदर्भदल्लि,
प्रणाम,
हागू शुभकामने गळु!
मित्रांनो,
काही वर्षांपूर्वी मला दत्त पीठम् ला भेट देण्याची संधी मिळाली. तेव्हा तुम्ही मला या कार्यक्रमाला येण्यासाठी सांगितले होते. मी तेव्हाच मनाशी ठरवले होते की मी पुन्हा तुमचे आशीर्वाद घ्यायला येईन,मात्र मी येऊ शकत नाही.मला आज जपानच्या दौऱ्यावर जायचे आहे. दत्त पीठम् च्या या भव्य कार्यक्रमाला मी कदाचित प्रत्यक्ष उपस्थित नसेन, पण माझी अध्यात्मिक उपस्थिती तुमच्यासोबत आहे.
या शुभ प्रसंगी मी श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आयुष्यातील 80 वर्षांचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो.आपल्या सांस्कृतिक परंपरेत 80 वर्षांचा टप्पा सहस्र चंद्रदर्शन म्हणूनही मानला जातो. मी पूज्य स्वामीजींना दीर्घायुष्य लाभो, अशी कामना करतो. त्यांच्या अनुयायांचेही मी मनापासून अभिनंदन करतो.
आज आश्रमातील 'हनुमत द्वार' प्रवेश कमानीचेही परमपूज्य संत आणि विशेष अतिथींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.यासाठीही मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. गुरुदेव दत्तांनी ज्या सामाजिक न्यायाची प्रेरणा आपल्याला दिली आहे, त्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही सर्व करत असलेल्या कामात आणखी एक दुवा जोडला गेला आहे.आज आणखी एका मंदिराचे लोकार्पणही झाले आहे.
मित्रांनो,
आपल्या शास्त्रात सांगितले आहे-
"परोपकाराय सताम् विभूतयः''।
म्हणजे साधुसंतांचा महिमा केवळ परोपकरासाठीच असतो. संत परोपकारासाठी आणि जीवांच्या सेवेसाठीच जन्म घेतात. त्यामुळे संताचा जन्म, त्यांचे जीवन हा केवळ त्यांचा वैयक्तिक प्रवास नसतो.तर समाजाच्या उन्नतीचा आणि कल्याणाचा प्रवासही त्याच्याशी निगडित आहे.श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींचा जीवनपट याचा प्रत्यक्ष पुरावा आहे, उदाहरण आहे. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कितीतरी आश्रम आहेत, इतक्या मोठ्या संस्था आहेत, वेगवेगळे प्रकल्प आहेत, पण सर्वांची दिशा आणि प्रवाह एकच आहे - जीवांची सेवा, जीवांचे कल्याण.
बंधू आणि भगिनींनो,
दत्त पीठम् च्या प्रयत्नांबद्दल मला सर्वात जास्त समाधान ज्यामुळे मिळते ते म्हणजे इथे अध्यात्मासोबतच आधुनिकताही जोपासली जाते.येथे भव्य हनुमान मंदिर आहे, त्यामुळे थ्रीडी मॅपिंग, साउंड आणि लाईट शोची व्यवस्था आहे.येथे इतके मोठे पक्षी उद्यान आहे आणि त्याच्या संचालनासाठी आधुनिक व्यवस्था आहे.
दत्त पीठम् हे आज वेदांच्या अभ्यासाचे प्रमुख केंद्र बनले आहे. इतकेच नव्हे तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली गीते , संगीत आणि स्वरांच्या सामर्थ्याचा उपयोग लोकांच्या आरोग्यासाठी कसा करता येईल, याविषयी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नवनवीन संशोधन सुरू आहेत.निसर्गासाठी विज्ञानाचा हा वापर, तंत्रज्ञानाचा अध्यात्मासोबत केलेला मिलाफ, हाच गतिमान भारताचा आत्मा आहे.मला आनंद आहे की, स्वामीजींसारख्या संतांच्या प्रयत्नाने आज देशातील तरुणांना त्यांच्या परंपरांच्या सामर्थ्याची ओळख होत आहे, त्यांना ते पुढे नेत आहेत.
मित्रांनो,
आज आपण स्वामीजींचा 80 वा जन्मदिवस अशा वेळी साजरा करत आहोत जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा महोत्सव साजरा करत आहे.
आपल्या संतांनी आपल्याला नेहमीच आत्मसन्मानाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गोष्टीसाठी काम करण्याची प्रेरणा दिली आहे. आज देश आपल्याला ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राने सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन करत आहे.आज हा देशही आपली प्राचीनता जपत आहे, तिचे संवर्धन करत आहे आणि आपल्या नवनिर्मितीला आणि आधुनिकतेला बळ देत आहे. आज भारताची ओळख ही योग आहे आणि तरुणाई देखील आहे.आज जग आपल्या स्टार्टअप्सकडे आपले भविष्य म्हणून पाहत आहे. आपला उद्योग,आपले 'मेक इन इंडिया' जागतिक विकासासाठी आशेचा किरण ठरत आहे.हे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. आणि माझी अशी इच्छा आहे की आपली अध्यात्मिक केंद्रेही या दिशेने प्रेरणा केंद्रे व्हायला हवीत.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या 75 वर्षात, आपल्याकडे पुढील 25 वर्षांचे संकल्प आहेत, पुढील 25 वर्षांसाठी उद्दिष्टे आहेत. मला विश्वास आहे की दत्त पीठमचे संकल्प स्वातंत्र्याच्या अमृत संकल्पांशी जोडले जाऊ शकतात.निसर्गाच्या रक्षणासाठी, पक्ष्यांच्या सेवेसाठी तुम्ही असामान्य कार्य करत आहात. मला वाटते, या दिशेने आणखी काही नवीन संकल्प हाती घेतले जावेत.जलसंवर्धन, आपल्या जलस्रोतांसाठी, नद्यांच्या सुरक्षेसाठी जनजागृती आणखी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य करायला हवे ,असे मी आवाहन करतो.
अमृत महोत्सवादरम्यान प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरही बांधले जात आहेत. या तलावांच्या देखभालीसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी समाजालाही आपल्यासोबत सहभागी करून घ्यावे लागेल.त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाला सततची लोकचळवळ म्हणून निरंतर पुढे घेऊन जायचे आहे. या दिशेने, स्वामीजी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी देत असलेल्या योगदानाची आणि विषमतेविरुद्धच्या त्यांच्या प्रयत्नांची मी विशेष प्रशंसा करतो.सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करणे, हेच धर्माचे खरे रूप आहे, जे स्वामीजी साकारत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की समाज बांधणी, राष्ट्र उभारणी या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये दत्त पीठम् अशीच महत्त्वाची भूमिका बजावत राहील आणि आधुनिक काळात, जीव सेवेच्या या यज्ञाला एक नवीन विस्तार दिला जाईल. आणि हाच जीव सेवा करून शिवसेवेचा संकल्प बनतो.
श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींच्या दीर्घायुष्यासाठी मी पुन्हा एकदा देवाकडे प्रार्थना करतो. त्यांची प्रकृती उत्तम राहो. दत्तपीठमच्या माध्यमातून समाजाचे सामर्थ्यही असेच वाढत राहो. याच भावनेसह , तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद !